कोण असतात ही माणसं....? 🏵🎛

कोण असतात ही माणसं....? 🏵🎛 काल मिडियात सर्वात ग्लॅमर मिळालेले,राष्ट्रपतींपासून सर्वजण ज्यांच्याविषयी बोलले त्या बोगद्यातून बाहेर आलेले ४१ कामगार कोण आहेत ? देशाच्या नजरेत येण्यापूर्वी कसे जगत होते ? आज प्रकाशझोत पडलेल्या माणसांच्या जीवनात इतरवेळीचा गडद अंधार नेमका कसा असतो..हे यानिमित्ताने बोलायला हवे. या घटनेतील सर्वात वाईट भाग म्हणजे जेव्हा आपण सर्वजण दिवाळीचे अभ्यंगस्नान दिवाळी पहाटेला करत होतो. त्याच दिवशी त्याचवेळी पहाटे हा बोगदा कोसळला. याचा अर्थ अगदी दिवाळीच्या दिवशी ही त्यांना या कामावर ठेकेदाराने सुटी दिली नव्हती ...मालक किती अमानवी असतात याचे हे समोर आलेले उदाहरण.... कुटुंबाचे दारिद्र्य इतके की सुटका झालेल्या मुलाला बघायला एक पालक काल घरातील सोन्याचे दागिने गहाण ठेवून मग प्रवास करत आला... अवघ्या ९ हजार रुपयांसाठी त्याने दागिने गहाण टाकून कर्ज काढले. ( व्याज आणि मुद्दल इतके वाढेल की दागिने सोडून द्यावे लागतात अशीच यांची स्थिती) यातील बहुतेक कामगार झारखंड,पश्चिम बंगाल,ओरिसा,उत्तर प्रदेशातून आले होते. एकट्या झारखंड मधून १५ कामगार आले होते. अनेकांच्या घरी एक एकर जमिनीपेक्षा कमी जमीन आहे. अनेकांचे वडील काम होत नाही इतके वृध्द आहेत.त्यामुळे त्यांची तरुण मुले कामाला बाहेर पडली. भुक्तू नावाच्या कामगाराचे वडील सांगतात की थंडीत गरम पांघरून सुध्दा घरात नाही, तेव्हा मी मजुरी आली की गरम पांघरून आणतो असे सांगून माझा मुलगा गेला होता.. ज्या कामगारांवर आज राष्ट्रपती, पंतप्रधान आणि सर्व VIP लक्ष ठेवत होते. मीडिया अपडेट ठेवत होता..त्या कामगारांच्या बहुतेक पालकांना आपला मुलगा नेमका कोणत्या कामासाठी आणि कोणत्या गावाला कामाला गेला हे सुध्दा माहीत नव्हते. इतके अज्ञान आणि गरिबीत जगणारे हे लोक होते..आपला मुलगा बाहेरगावी गेल्यावर आपण रोज अपडेट घेतो... प्रेमाची काळजीची ही चैन सुद्धा या गरिबांना परवडत नाही. .हे किती वेदनादायक आहे.. एका कामगाराचे वडील दिव्यांग आहेत. त्यांचा एक मुलगा मुंबईत पुल बांधकामात वारला आहे आणि दुसरा बोगद्यात अडकला. त्यामुळे आता उपाशी राहू पण पुन्हा मुलाला मी कामावर पाठवणार नाही... असे ते सांगतात.. अतिशय कमी मजुरी, आरोग्याचे निर्माण होणारे गंभीर प्रश्न, निकृष्ट अन्न आणि त्याबरोबर राहण्याच्या आणखी निकृष्ट सुविधा...आणि वर असे जीवघेणे धोके हे या देशातील स्थलांतरित मजुरांचे जगणे आहे.... वेगवेगळ्या आकडेवारीनुसार आपल्या देशातील १५ कोटी मजूर असे घर सोडून दूरवर आपल्या राज्यात किंवा इतर राज्यात अशा कामाला जातात.. हे ४१ मजूर त्या वेदनेच्या हिमनगाचे टोक आहेत. सुरक्षित नोकरी, नियमित कामाचे तास, सुटी आणि भरपूर पगार घेणारे आपण यांचे जगणे समजूच शकणार नाही.... गरीब राज्यातले हे मजूर अल्पभूधारक किंवा भूमिहीन. पावसाळ्यात जे पिकेल ते पिकवायचे. सिंचनाच्या सोयी नाहीत म्हणून दिवाळीनंतर शेतीत काहीच काम नाही.मग जगायला ते निघतात मोठ्या शहरांकडे. किती दूर जावे ? अगदी २००० किलोमीटरवर. बंगालमधला मजूर थेट मुंबईत. ओरिसातले मजूर थेट आंध्रमधील वीटभट्टीवर. जनावरे न्यावीत तसे रेल्वेच्या बोगीत कोंबून यांना नेले जाते.अनेकदा खूप मजूर बोगीत कोंबले म्हणून अगदी चेंगरून मृत्यू झालेत या मजुरांचे रेल्वेत. यावरून त्यांच्या जगण्याची कल्पना यावी कामाच्या ठिकाणी होणारे अत्याचार, मानवी सुविधा नसणे, राहण्याची सोय नसणे, निकृष्ट जेवण, दिवसरात्र करावे लागणारे काम,महिलांवरचे ठेकेदाराकडून होणारे अत्याचार आणि आर्थिक फसवणूक, वेठबिगारी, कर्ज या सापळ्यात अडकलेले हे गरीब जीव कसेतरी जगत होते स्वत:ला पणाला लाऊन... किमान या घटनेने देशातील सरकार काही काळ तरी यांच्याविषयी संवेदनशील झाले...अगदी गरम अन्न,मनोरंजन इथपर्यंत या कामगारांची काळजी घेतलेली सरकारे या कामगारांच्या जगण्याविषयी इथून पुढे तरी धोरणात्मक संवेदना दाखवेल का ? ते मरू नयेत म्हणून सरकारने जितकी काळजी केली तितकी काळजी आता देशातील स्थलांतरित मजुर नीट जगतील म्हणून देशातील सर्व सरकारे करतील का ...? हेरंब कुलकर्णी ताजा कलम : ऐन दिवाळीत मजुरांना कामाला जुंपणारा तो क्रूर ठेकेदार, काम बंद होते म्हणून या मजुरांची १७ दिवसाची मजुरी कापणार नाही ही अपेक्षा करू या.. ════════ ⋆★⋆ ════════ अश्याच रोचक तथ्यांसाठी कनेक्ट राहा 🔥 लाईक करा | शेयर करायला विसरू नका 🔥 🍀 सर्व सदस्यांना विनम्र आवाहन : 🙏 आपण आपले अभिप्राय,सुचना, प्रतिक्रिया, प्रतिसाद, नक्की नोंदवा व आपल्या जवळच्या मित्रपरिवाराला देखील शेयर करा. धन्यवाद ☞ आपला अभिप्राय नोंदवा  " 👍🏻 🤝 👌🏻 🙏🏻 💐 🌷 🟢 🩵 " दाबुन

Comments